पाटणा – बिहारमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्द्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्याशी चर्चा केली. “एनडीए’ मधील घटक पक्षांबरोबरच्या चर्चेचा भाग म्हणून ही चर्चा झाली.
नड्डा यांच्या समवेत पक्षाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी, पक्षाचे सरचिटणीस आणि बिहारसाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव आणि प्रदेशाध्यक्ष संजय जैसवाल हे देखील उपस्थित होते. तर नितीश कुमार यांच्या समवेत संयुक्त जनता दलाचे नेते राजीव रंजन सिंह ऊर्फ लालन हे ही यावेळी उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या निवासस्थानीच ही बैठक झाली. हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झालेले मात्र पाटण्यामध्येच लहानाचे मोठे झालेल्या नड्डा यांचे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले.
अर्ध्यातासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या बैठकीमध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जागा वाटपाशी संबंधित प्रमुख मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी “एनडीए’तील अन्य पक्षांसाठीच्या जागा वाटपाबाबतही चर्चा झाली.
रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पार्टी हा देखील या जागावाटपातील वाटेकरी पक्ष असणार आहे. जेडीयू आणि एलजेपी या दोन पक्षांमधील मतभेद मिटवण्यासाठी भाजप हस्तक्षेप करेल, असे भाजपच्या नेत्यांनी यावेळी सांगितले.
“एनडीए’मधून कोणीही बाहेर पडणार नाही, पण अधिक जण सहभागी होतील.’ असे भाजपचे निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी आदल्याच दिवशी पत्रकार परिषदेमध्ये सूचित केले होते. लोकजनशक्ती पार्टीचे युवा अध्यक्ष चिराग पासवान यांच्या ताठर भूमिकेमुळे जेडीयू आणि एलजेपीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
बिहारमधील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.