नगर (प्रतिनिधी) – महत्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेची वस्तू भिडेवाडा या ठिकाणीची जागा शासनाने तात्काळ भुसंपादीत करावी. ही जागा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करुन विकसित करावी, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, सावता परिषदेचे निखिल शेलार, नितीन डागवाले, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, आशिष भगत, सावता युवक संघाचे अशोक तुपे, दीपक साखरे, लवेश गोंधळे, अखिल भारतीय माळी युवा मंचचे जालिंदर बोरुडे, डॉ.सुदर्शन गोरे आदी उपस्थित होते.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 साली मुलींची पहिली शाळा काढली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोहचवली. ज्या फुले दाम्प्यांनी अनेक अडीअडचणींचा सामना करुन, विरोध पुकारुन देशातील मुलींसाठी भिडेवाडा येथून शिक्षणाची दारे खुली करुन दिली आहेत. त्यामुळे ही जागा शासनाने भुसंपादित करुन राष्ट्रीय स्मारक म्हणून लवकरात लवकर घोषित करुन विकसित करावे.
अन्यथा शासनाच्या विरोधात संपूर्ण राज्यात समता परिषद समितीच्यावतीने जनआंदोलन करण्यात येईल,असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी आकाश महाराज फुले, शेखर तांबे, विशाल गायकवाड, राहुल शेलार आदिंसह समता परिषद, सावता परिषद, फुले ब्रिगेड, संत सावता युवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.