आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज सवलतीचा लाभ : डॉ. सरकाळे
सातारा (प्रतिनिधी) – जिल्हा बॅंकेच्या कम्पोझिट नं. 3 या कर्ज योजनेतून नवीन व्यवसाय, उद्योग उभारणीसाठी कर्ज दिले जात असून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत व्याज सवलतीचा लाभ मिळणार आहे. त्याचा नवोद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी घ्यावा.
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विकासनगर, ता. सातारा येथील शाखेचे ग्राहक शिवाजी श्रीमंत घाडगे यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत बॅंकेच्या कम्पोझिट नं. 3 या कर्ज योजनेतून ऑइल हिट एक्सचेंजर मशीन खरेदीसाठी 10.51 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. डॉ. सरकाळे यांच्या हस्ते कर्जदारस मशीनची सामग्री देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जिल्हा बॅंक पोहोचली असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेती व शेतीपूरक कारणांसाठी जिल्हा बॅंक अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करते. व्यवसाय उभारणीसाठी नवोद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, पगारदार सभासदांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत मिळणाऱ्या व्याज सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सरकाळे यांनी केले. सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे म्हणाले, बॅंकिंग क्षेत्रात तीव्र स्पर्धा असूनही जिल्हा बॅंकेने ग्राहकांना सार्वजनिक व खाजगी बॅंकांप्रमाणे आधुनिक बॅंकिंग सेवा देत आहे.
मराठा समाजातील नवोद्योजकांना व्यवसायात स्थिर होण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत जिल्हा बॅंकेच्या कम्पोझिट लोन नं. 3 या योजनेतून कर्ज पुरवठा केला जातो. उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, विभागीय विकास अधिकारी श्रीमंत तरडे, दत्तात्रय सावंत, शाखाप्रमुख सौ. घनवट, विकास अधिकारी श्री. राजेकदम, विक्री अधिकारी यादव, अधिकारी व सेवक उपस्थित होते.