राजगुरूनगर (प्रतिनिधी) : खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्गामुळे जवळपास ७५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. करोना उपचारात व्हेंटिलेटर चा आभाव हे कारण असल्याने तालुक्यात हि सेवा मिळावी यासाठी अनेक कंपन्यांकडे खेड पंचायत समितीच्या माध्यमातून पाठपूरावा करण्यात आला होता. अखेर त्यास यश आले. तालुक्यात ६ व्हेंटिलेटर सीएसआर निधीतून मिळाल्याने तालुक्यातील करोना अत्यवस्थ रुग्णांना उपचार मिळणार आहेत.
खेड तालुक्यात झपाट्याने करोना वाढत आहे. . रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृत्यूचा तगादा वाढत आहे.तालुक्यात व्हेंटिलेटर ची सुविधा कमी असल्याने उपचारादरम्यान बाधित व्यक्तीचा मृत्यू होत असल्याने खेड पंचायत समितीच्या माध्यमातून चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांकडे त्यांच्या सीएसआर मधून व्हेंटिलेटर मिळण्यासाठी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, गटविकास अधिकारी अजय जोशी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केला होता. त्यानुसार मागिल आठवड्यात ३ वेंटिलेटर तालुक्याला मिळाले आहेत तर पार्कसन पॅकेजिंग या कंपनीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या दर्ज्याचे ३ व्हेंटिलेटर आज उपलब्ध करून देण्यात आली आहेत. पुढील दोन दिवसात अजून २ व्हेंटिलेटर प्राप्त होणार आहेत.
कंपन्यांनी दिलेली व्हेंटिलेटर महात्मा फुले जन आरोग्य याेजने अंतर्गत उपचार देणाऱ्या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलला ठेवण्यात येणार आहेत. तेथे बाधित व्यक्तींना याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटर मध्ये पार्कसन पैकेजिंग या कंपनीच्या माध्यमातून तीन व्हेंटिलेटर देण्यात आले. यावेळी खेड पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे कंपनीचे मुख्याधिकारी सुभासिस रॉय, गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ बळीराम गाढवे, माजी उपसभापती अमोल पवार, भगवान पोखरकर, सुनील खंडेलवाल, सुधीर शिरसाठ, हर्ष पाटिल, उदय नलावडे, कोविड केअर केंद्रातील डॉ.पांडे, डॉ.अपेक्षा बोरकर, डॉ.विलास, डॉ.चव्हाण उपस्थित होते.