साना – इराणच्या मदतीने हौथी गनिमांनी समुद्रमार्गे व हवाई मार्गे दोन मोठे हल्ले योजले होते पण आम्ही ते हल्ले हाणून पाडले आहेत असा दावा सौदी अरेबिया पुरस्कृत आघाडीने केला आहे.
लाल समुद्रात आंतरराष्ट्रीय शिपींग केंद्राच्याजवळ स्फोटकांनी भरलेली बोट पाठवून काही मोठ्या बोटी उडवण्याचा कट हौथी गनिमांनी केला होता. स्फोटकांनी भरलेली बोट दूरनियंत्रकाद्वारे नियंत्रीत केली जात होती. पण ती आधीच थांबवून उडवून देण्यात आली. त्यात किमान तीन जण ठार तर अन्य पाच जण जखमी झाले होते.
या स्फोटात सौदी – येमेन आघाडीच्या पाच जहाजांचेहीं नुकसान झाले. लाल समुद्रातील आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतूक बंद पाडण्याच्या हेतून हा दहशतवादी हल्ला करण्यात आला अशी माहिती येमेनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सौदी अरेबियातील अभा विमानतळावरही स्फोटकांनी भरलेली ड्रोन पाठवून तेथेही स्फोट घडवण्याचा हौथी गनिमांचा इरादा होता तोही हाणून पाडण्यात आल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले. काल रविवारी हा प्रकार घडला. ही ड्रोन हवेतच पाडण्यात आली. त्याचे अवशेष विमानतळाच्या परिसरात पडले पण त्यातून विमानतळाचे काहीही नुकसान झाले नाही.