पूर्व जर्मनीला युद्ध-नुकसान भरपाईची सूट
पॅरीस, ता. 23 : गेल्या महायुद्धांत झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून पूर्व जर्मनीला रशियाला द्यावी लागणारी खंडणी 1 जानेवारी 1954 पासून न घेण्याचें रशियन सरकारनें ठरविलें असल्याचें वृत्त “टास’ या रशियन वृत्तसंस्थेनें पाठविलें आहें.
रशियानें पूर्व जर्मनीला दिलेल्या या सवलतीबाबत पूर्व जर्मन व रशियन सरकार यांचा नुकताच एक करार झाल्याचें “टास’चें वृत्त आहें. रशिया, अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स या राष्ट्रांची गेल्या महायुद्धांत झालेल्या नुकसानीची भरपाई बऱ्याच मोठ्या प्रमाणांत जर्मनीने केलेली असल्यानें ही सूट पूर्व जर्मनीला देण्यात येत आहें, असें रशियन सरकारचे म्हणणे आहें.
पश्चिम जर्मनीला आमीष…..
रशियाप्रमाणेच अमेरिका, ब्रिटेन आणि फ्रान्स या राष्ट्रांनी पश्चिम जर्मनीला नुकसान भरपाईची सूट दिली, तर जर्मनीची आर्थिक प्रगती झपाट्याने होईल आणि अंखड जर्मनीची निर्मिति लवकरच होईल, असें या करारात नमूद करण्यात आलें आहें.
वरील करार करण्यासाठी पूर्व जर्मनीचे पंतप्रधान ऑटो ग्रोटवाल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मॉस्को येथे आलें असून करारावर उभय पक्षांच्या सह्या झाल्यावर रशियाचे पंतप्रधान जॉर्जी मेलेन्कॉव्ह यांचे पूर्व जर्मन शिष्टमंडळासमोर भाषण झालें.
मेलेन्कॉव्ह यांचे भाषण..
मेलेन्कॉव्ह आपल्या भाषणांत म्हणाले, “”आज जर्मनी एका मोठ्या ऐतिहासिक अवस्थेंतून पार पडत आहें. जगातील प्रतिगामी राष्ट्रे पश्चिम जर्मन सरकारला हाताशी धरून जर्मनीचें अखंडत्व आणि स्वातंत्र्य या विरुद्ध मोठा व्यूह रचीत आहेंत. आपल्या आक्रमक धोरणाला पोषक अशा जर्मन हुकूमशाही प्रवृत्तीची हीं राष्ट्रे जोपासना करीत आहेंत.
दारूचें कोठार कीं शांततेचें आशास्थान ..
“”नवें युद्ध टाळावें आणि आक्रमक शक्तींचा पाडाव करावा, हे महान कार्य पार पाडण्याची जबाबदारी जर्मन जनतेवर येऊन पडली आहें. शांततेनेंच जर्मनीचें एकीकरण आणि स्वातंत्र्य निर्माण होईल. नव्या युद्धाचें जर्मनीचे हे युरोपातील दारूचें कोठार करावें कीं, युरोपचे शांततेचें आशास्थान ठरावे, यात आपल्याला विवेक करावयाचा आहें. पश्चिम जर्मन सरकार पाश्चिमात्य राष्ट्रांच्या हातातील बाहुलें झालें आहें, असे सांगून जर्मन सरकारच्या आडमुठ्या धोरणांमुळेच जर्मनीबरोबर खराखुरा शांतता तह नाहीं.”