मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. सुशांतच्या घरी 13 जूनला एक पार्टी झाल्याचा दावा सुरुवातीपासून करण्यात आला. मात्र, सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने दिलेल्या माहितीनुसार 13 जूनला सुशांतच्या घरातील लाईट लवकर बंद झाले होते. तसेच त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, अशी माहिती या महिलेने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयपुढे या प्रकरणाचा उलगडा करण्याचा नवं आव्हान आहे.
या महिलेने सांगितलं, सुशांतच्या घरातील सर्व लाईट 13 जून रोजी साडेदहा पावणेअकरा वाजल्याच्या सुमारासच बंद करण्यात आले होते. त्याच्या घरात इतक्या लवकर अशा पद्धतीने लाईट बंद होत नसे. तो उशिरापर्यंत जागायचा. मात्र, त्या दिवशी माध्यमांमध्ये जसं सांगितलं जात आहे की पार्टी होती, तशी कोणतीही पार्टी नव्हती.सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सोबत राहत होता. घटनेच्या दिवशी तो घरीच होता. त्यामुळे सीबीआय सुशांतबद्दल आणि त्याच्या आत्महत्येबद्दल त्याची चौकशी करत आहे.
सीबीआय अधिकाऱ्यांकडून आज फॉरेन्सिक तपासही सुरु आहे. 14 जूनला घटना कशी घडली याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुशांतच्या वजनाचा पुतळा आणून सीबीआय अधिकाऱ्यांनी घटनेचं नाट्य रुपांतर करुन घटना समजून घेतली.
सीबीआयचे अधिकारी गेल्या 2 दिवसांपासून सुशांतचा नोकर नीरज सिंग याची चौकशी करत आहेत. नीरजकडे महत्वाची माहिती आहे. घटनेच्या दिवशी नीरज त्या ठिकाणी होता. त्यामुळे त्याच्याकडून तपासाचा दुवा मिळू शकतो, असं सीबीआयच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे. त्यामुळेच त्याची सतत चौकशी सुरु आहे.