ओझर – अष्टविनायकामतील ओझर (ता. जुन्नर) येथील श्री विघ्नहर गणपतीचा भाद्रपती गणेश जयंती उत्सव व द्वारयात्रा यंदा करोनामुळे रद्द करण्यात आली आहे, असे देवस्थानच्यावतीने जाहीर करण्यात आले.
श्री विघ्नहर गणपतीचा भाद्रपती गणेश जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. उत्सवानिमित्त या ठिकाणी हजारो भाविकांची गर्दी होत असते. करोनाचा संसर्ग वाढू नये तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून “श्रीं’ चा जन्मोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, मंदिर मार्च महिन्यापासून अनिश्चित काळासाठी बंदच असल्याचे देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गणेश जयंती उत्सवानिमित्त ओझर येथील द्वारयात्रेस विशेष महत्व असून श्री आपल्या बहिणींना आणण्यासाठी चार गावांमधील मंदिरात पालखी घेऊन जातात, अशी आख्यायिका आहे. या सोहळ्यास हजारो भाविक अनवाणी पालखीसोबत चालतात. या द्वार यात्रेत पहिला पूर्वद्वार उंब्रज येथील लक्ष्मी-नारायण पूजन, दुसरा दक्षिणद्वार धनेगाव (धनगरवाडी) येथील उमा-महेश पूजन, तिसरा पचिमद्वार शिरोली खुर्द येथील रति-कंदर्प पूजन व चौथा उत्तरद्वार अंबेराई ओझर येथील पृथ्वी-सूर्य पूजन होऊन पालखी मंदिरात आणून गणेश जन्मोत्सव सोहळा होतो. मात्र, यंदा हा सोहळा रद्द केला असून भाविकांनी मंदिरात येवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
जुन्नर तालुक्यात कोरोना संक्रमण रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मंदिर उघडता येत नाही. “श्रीं’चा जन्मोत्सव फक्त देवस्थानचे पुजारी वृंद यांच्या हस्ते होणार असून श्री विघ्नहराच्या जन्मोत्सवाचे धार्मिक कार्यक्रम करण्यात येणार आहे. देवभेटसुद्धा पुजारी वृंद घडवून आणणार आहे.
– बी. व्ही. मांडे, अध्यक्ष, श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट