अबब… एका किलोमीटरसाठी सव्वादोनशे रिक्षाभाडे

भाडे न दिल्याने प्रवाशाला दगडाने मारहाण

पिंपरी (प्रतिनिधी) – अवघ्या एक किलोमीटरच्या प्रवासाचे रिक्षा चालकाने सव्वादोनशे रुपये भाडे मागितले. प्रवाशाने एवढे पैस देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशाच्या डोक्‍यात दगड मारून गंभीर जखमी केले. ही घटना काळेवाडी येथे घडली.

विशाल भास्कर शेंडगे (वय 28, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे जखमी प्रवाशाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 18) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजीज आयुब शेख (रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेंडगे हे आपल्या पत्नी आणि मुलीसह काळेवाडी परिसरात काही कामानिमित्त आले होते. घरापासून ते अवघ्या एक किलोमीटर अंतरावर होते. रात्री आठ वाजताच्या सुमारास पाऊसाला सुरवात झाल्याने त्यांनी घरी भिजत जाण्यापेक्षा रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तोंडओळखीच्या आरोपी अजीज शेख याची रिक्षा केली.

घरी आल्यावर त्यांनी रिक्षा चालकाला 20 रुपये भाडे दिले. मात्र रिक्षा चालकाने आणखी 200 रुपयांची मागणी केली. मात्र एक किलोमीटरच्या अंतराला एवढे पैसे देणार नसल्याचे फिर्यादी शेंडगे यांनी स्पष्टपणे सांगत 200 रुपये देण्यास नकार दिला. या कारणावरून संतापलेल्या रिक्षा चालक शेख याने बाजूला पडलेला दगड शेंडगे यांना फेकून मारला. डोक्‍यात दगड लागल्याने शेंडगे हे गंभीर जखमी झाले आहेत.

पूर्वी रिक्षाचालक रिक्षामधून सहा किंवा त्यापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करीत होते. मात्र करोनामुळे रिक्षा चालकांवर बंधने आली असून एका रिक्षात केवळ दोनच प्रवासी घेण्याची मुभा दिला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे. त्यापेक्षा अधिक प्रवासी असल्यास रिक्षा चालक मनमानी पद्धतीने भाडेआकारणी करतात. त्यातून रिक्षा चालक आणि प्रवाशांमध्ये खटके उडताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.