डोनाल्ड ट्रम्प ट्रम्प यांचा इशारा
वॉशिंग्टन – चीनमधील ई कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अलिबाबावर अमेरिकेत बंदी घालण्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. टिकटॉकची पालक कंपनी बाईट डान्सला लक्ष्य करणाऱ्या आदेशांवर स्वाक्षरी केल्यानंतर काही दिवसातच ट्रम्प यांनी हे संकेत दिले आहेत. अमेरिकेतील एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
टिकटॉकची पालक कंपनी असलेल्या बाईट डान्सने टिकटॉकशी संबंधित सर्व व्यवहार 90 दिवसांच्या आत अमेरिकेतून बंद करावेत, अशा आशयाच्या कार्यकारी आदेशांवर ट्रम्प यांनी 14 ऑगस्ट रोजीच स्वाक्षऱ्या केल्या होत्या. बाईट डान्सच्या कामातून अमेरिकेच्या हिताला बाधा पोहोचवली जाऊ शकते, अशी खात्रीशीर माहिती मिळाली असल्याचे ट्रम्प यांनी तेंव्हा सांगितले होते. या आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी करण्यापूर्वीच त्यांचे नवीन आदेशही आले आहेत. जर बाईट डान्सने 45 दिवसात आपला गाशा गुंडाळला नाही, तर अमेरिकेतील ऍप स्टोअरच्या माध्यमातून टिकटॉकचे वितरण थांबवले जाऊ शकेल, असे पूर्वीच्या आदेशात म्हटले होते. आता नव्या आदेशानुसार बाईट डान्सला अमेरिकेतील वापरकर्त्यांच्या कॉपी नष्ट कराव्या लागतील.
अमेरिकेच्या नागरिकांच्या हिताला बाधा पोहोचवू शकणाऱ्या टिकटॉक, वुईचॅटसारख्या ऍपवर बंदी घालण्यासाठी ट्रम्प प्रशासन गांभीर्याने प्रयत्न करत आहे. ऍपल आणि गुगलकरवी चालवल्या जाणाऱ्या या ऍपना अमेरिकेतील ऍप स्टोअरमधून हटवण्याची आपली ईच्छा असल्याचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही म्हटले आहे. गेल्या महिन्यात भारतातही 59 चिनी ऍपवर बंदी घालण्यात आली आहे.