रहिमतपूर (प्रतिनिधी)- रहिमतपुरमध्ये गेल्या चार दिवसांपासून करोनाचे रुग्ण आढळू लागल्यामुळे शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज 11 जण नवे पॉझिटिव्ह रुग्म आढळले आहेत.
जिल्हयात करोनाचे थैमान सुरु होते. रहिमतपुर नगरपालिकेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी अविरत काम करीत करोनाच्या साथीला अटकाव केला होता. परंतु, रहिमतपूरमध्ये एका दिवसात अकरा करोनाबाधित आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज करोनाबाधितांच्या सहवासातील 41 जणांचे अहवाल तपासण्यात आले असता त्यामध्ये 11 जण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने रहिमतपूरमध्ये खळबळ उडाली आहे.
करोना आपत्ती व्यवस्थापन समिती, आरोग्य विभाग आणि नगरपालिकेच्या वतीने बाधितांच्या सहवासातील 41 जणांचे रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ब्रह्मपुरी येथे अहवाल तपासण्यात आले. त्यामधील 11 जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये चार पुरुष व सात महिलांचा समावेश आहे.
गुरुवारी 27 जणांची तपासणी करण्यात आली. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने रहिमतपुरकरांची चिंता कमी होत असताना आज अचानक 11 पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.