पुणे – मार्केट यार्डातील फुल बाजार आकरा दिवसाच्या बंदनंतर शनिवारपासून सुरू झाला. पहिल्याच दिवशी बाजारात सुमारे 137 क्विंटल आवक झाली असून, नऊ लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत 20 टक्के असल्याची माहिती फुल विभागप्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.
करोना संसर्गाच्या काळात झालेली ही मोठी आवक झाली. श्रावण महिना सुरू झाला असून, आज नागपंचमी आहे. त्यामुळे फुलांना मागणी वाढली आहे. विशेषत: गजरा बनवण्यासाठी वापरणाऱ्या जुई फुलाला जास्त मागणी होती. घाऊक बाजारात किलोस तब्बल 350 रुपये भाव मिळाल्याचे अखिल पुणे फूलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरूण वीर यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे 14 जुलैपासून फुलबाजार बंद होता. जीवनावश्यक वस्तु असल्याने भुसार, फळे-भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग पाच ते सहा दिवसांनी सुरू झाला. मात्र, फुलबाजार जास्त दिवस बंद् ठेवण्यात आला होता. बाजार समितीने ठरवून दिल्याप्रमाणे दररोज निम्म्या अडत्यांचा बाजार सुरू असतो.