पुणे : शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकाला बलात्काराच्या खोट्या गुन्हयात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी आणि काही कोटी रुपयांची जागा नावावर करुण देण्याची मागणी केल्याप्रकरणात अमोल सतिश चव्हाण (चव्हाणवाडा, कोथरुड) याचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी फेटाळला.
या गुन्ह्यात माहिती अधिकार कार्यकर्ता रविंद्र लक्ष्मण बऱ्हाटे (रा. लुल्लानगर, कोंढवा) याचा अटकपूर्व जामीन यापूर्वीच फेटाळण्यात आला आहे.
या प्रकरणात एका महिलेसह बडतर्फ पोलीस कर्मचारी शौलेश हरिभाऊ जगताप (रा.भवानी पेठ), स्वयंघोषित पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन (रा.प्रियदर्शन सोसा.सिंहगड रोड) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरूवातीला पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी आणि त्यानंतर तिघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. याबाबत सुधीर वसंत कर्नाटकी (64,रा.राजगड, पौड) यांनी फिर्याद दिली आहे.
नोव्हेंबर 2019 ते आतापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला. यामध्ये चव्हाण याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया यांनी विरोध केला. तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी आणि मारामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र बऱ्हाटे याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला आहे.
चव्हाण आणि इतर आरोपींनी मिळून या गुन्हासाठी कट केला असून, तो कोठे केला, तो केव्हापासून अशा प्रकारे खंडणी मागण्याचे काम करत आहे. अशा प्रकारे आणखी कोणाला खंडणी मागितली आहे का, याचा तपास करण्यासाठी त्याला अट्क करून तपास करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळण्याची मागणी ऍड. राजेश कावेडीया यांनी केली.