दिवे -सोनोरी (ता. पुरंदर) या गावात करोना रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला असून रुग्णसंख्या 31 वर पोहोचली असून तालुक्यातील ग्रामीण भागात हा उच्चांक आहे.
करोनाची वाढती साखळी तुटणे गरजेचे आहे. यासाठी लोकांनी कोणताही विचार न करता कमीत कमी 14 दिवस गाव कडकडीत बंद ठेवून करोनाची साखळी तोडावी, असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले. गावात तहसीलदार रुपाली सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली कमिटीने तातडीने गावाला भेट दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सहायक निरीक्षक राहुल घुगे, माजी सरपंच बाळासाहेब काळे, सतीश शिंदे, रामभाऊ काळे, अमोल काळे, ग्रामसेविका ज्योती काळभोर, तलाठी साईनाथ गवळी, आरोग्य सेवक संदीप सपकाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी सासवड नगरपालिकेची फवारणी मशीन गावाला औषध फवारणीसाठी देत असून तातडीने संपूर्ण गावात औषधांची फवारणी करून घ्यावी. लोकांनी घरातच राहून शासनाला सहकार्य करावे. करोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाशी समन्वय साधत महामारीवर मात करावी, असे आवाहन यावेळी आमदार जगताप यांनी केले.