पिरंगुट, दि. 14 (वार्ताहर) -करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनला मुळशीत पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प होते.
पुणे जिल्ह्यात करोना संसर्ग वाढत आहे. यामुळे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यात आजपासून पुढील दहा दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे.
मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस वाढणारी करोनाची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मुळशी तालुक्यातील भूगाव, भुकूम, पिरंगुट, नांदे, घोटवडे आणि हिंजवडी येथील ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात संपूर्णतः टाळेबंदी घोषित केली आहे. आज पहिल्याच दिवशी लॉकडाऊनला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. वरील गावातील बॅंका, सरकारी कार्यालये, दवाखाने, मेडिकल सेवा सुरळीतपणे चालू होती. तर दूध डेअरी निर्धारित वेळेत सुरू होत्या.
उद्योगांना या क्षेत्रातून वगळ्याने पिरंगुट, उरवडे, घोटवडे, कासारआंबोली, अंबडवेट, सुतारवाडी आदी भागातील औद्योगिक कारखाने नियमांचे पालन करून सुरू होते. दरम्यान पौड पोलिसांच्या वतीने तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव येथे नाकाबंदी करण्यात आली आहे.