वाई (प्रतिनिधी) – वाई शहरात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून वाई पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्याचे काल (दि. 12) रात्री आलेल्या अहवालानुसार स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित पोलिसाच्या संपर्कात आलेले अन्य कर्मचारी व नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. बाधित पोलिसाच्या संपर्कात 17 पोलीस आले असून त्यांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत. सोनगीरवाडीतील पोस्ट ऑफिस परिसरात राहणाऱ्या आणि मासे, चिकन विकणाऱ्या एकाच घरातील तिघे करोनाबाधित झाले आहते. त्यांच्या संपर्कातील 20 जण “हाय रिस्क’मध्ये आहेत. शहरात बाधितांची एकूण संख्या 31 झाली आहे.
आरोग्य विभागाकडे शनिवारी आलेल्या अहवालातून वाईतील चौघे करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये 54 वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात घरातील पाच व पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मिळून 17 जणांचा समावेश आहे. सोनगीरवाडीतील पोस्ट ऑफिस परिसरातील 36 वर्षांचा युवक, 70 वर्षांच्या वृद्ध व 14 वर्षांच्या मुलाला करोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांची माहिती मिळवण्याचे काम दिवसभर सुरू होते. व्यावसायिक बाधित असल्याने संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरात गेल्या तीन आठवड्यात 29 बाधित सापडले आहेत. वाईतील अन्य दोघांनी पुण्यात तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. ब्राह्मणशाहीतील “सारी’ची रुग्ण व करोनाबाधित वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 13 जणांनी करोनावर मात केली आहे.वाईतील व्यवहार दहा दिवस बंद आहेत. धर्मपुरी, ब्राह्मणशाही, गणपती आळी, सोनगीरवाडी येथे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे घोषित करण्यात आली आहेत. धोम कॉलनी, जेजुरीकर कॉलनी या उपनगरांमध्येही रुग्ण आढळले आहेत. पालिका प्रशासन व आरोग्य विभाग घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.