पुणे: “मी आजपर्यंत केलेल्या कीर्तनातून कधीच महिला अपमानित होतील किंवा त्यांचा अनादर होईल, अंधश्रद्धा पसरेल असे वक्तव्य केलेले नाही. माझे कोणी समर्थक नाही, अज्ञात लोकांनी तृप्ती देसाई यांना धमकी दिली असेल तर त्यास मी जबाबदार नाही,’ असे निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांनी स्पष्ट केले आहे.
“इंदोरीकर यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत जाहीररित्या अपमान केला,’ असा आरोप करत या विषयावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती.
“महिलांची जाहीर माफी मागावी व पुन्हा अशी टिप्पणी करणार नाही असे जाहीर करावे,’ अशी मागणी देसाई यांनी नोटिशीद्वारे केली होती. यावर इंदोरीकर महाराज यांनी त्यांचे वकील ऍड. डॉ. मिलिंद साळुंखे यांच्यामार्फत उत्तर दिले आहे.