मुंबई – देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात कोरोनाविरोधात लढाई सुरु आहे. राज्यात पहिला कोरोनारुग्ण सापडल्यापासून वैद्यकीय यंत्रणांसोबतच पोलीस दलही कोरोनाविरोधात उभा ठाकलं असून एरवी दृश्य क्षत्रूंचा नायनाट करण्यासाठी तत्पर असलेले पोलीस सध्या अदृश्य कोरोना विषाणूशी दोन हात करतायेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील ठाकरे सरकारतर्फे पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या ८ हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी २ हजार जागा वाढवून एकूण १० हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरती प्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी, करोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया विनाअडथळा यशस्वीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देश दिले असून मंत्रिमंडळ मंजूरीनंतर भरती प्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.