पुणे – पुणे शहरालगत असलेले कोंढवे-धावडे गावही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याकामी सरसावले असून यापुढे गावात चिनी वस्तू वापरणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने तसा ठराव करण्यात आला आहे. दि. 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
अगदी शहरालगत असलेल्या कोंढवे-धावडे या गावची लोकसंख्या अंदाजे 15 हजार इतकी आहे. या गावात अनेक दुकाने आहेत. कोंढवे-धावडे गावातील दुकानदार, व्यापारी वर्ग यांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन तसेच संपूर्ण गावात बॅनर लावून, दवंडी देऊन चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भारतीय बनावटीचेच साहित्य वापरणार…
ग्रामपंचायतीमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य हे भारतीय बनावटीचे वापरण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत अथवा शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही कामासाठी चायनीज वस्तूंचा वापर केला जाऊ नये, असे निर्देशही ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.