फुरसुंगी (प्रतिनिधी) – सासवड मार्ग ते खडी मशीन चौकादरम्यान कात्रज बाह्यवळण मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम काही प्रमाणात झाले आहे. मात्र, या मार्गावर हांडेवाडी येथे रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहने थांबत असल्याने तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. हा रस्ता म्हणजे व्यावसायिकांची सोय तर अवजड वाहनांसाठी फुकटचे वाहनतळ झाले आहे. हडपसर वाहतूक पोलिसांनी रस्त्याकडेला पार्क केलेल्या अवजड वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी व नागरिकांनी केली आहे.
सोलापूर महामार्गावरून शहरात जाणारी सर्व अवजड वाहतूक हडपसर-गाडीतळमार्गे सासवड मार्गे वळवुून मंतरवाडी चौकातून कात्रज बाह्यवळण मार्गावरून वळविल्याने या मार्गावर वाहतूक वाढली आहे. यात अवजड वाहनांचे प्रमाण अधिक आहे. हा रस्ता हांडेवाडी, उंड्री, पिसोळी या दाट लोकवस्ती असलेल्या गावांतून जात असल्याने इतर वाहनांचीसुद्धा मोठी वर्दळ असते. हांडेवाडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी बार, अँगल, पाइप व बांधकामाचे लोखंड विक्रेत्यांची मोठमोठी गोदामे व दुकाने आहेत. या दुकांनात रोजच्या रोज ट्रक माल घेऊन येतात. दुकानदारांसमोर जागा नसल्याने अशी अवजड वाहने रस्त्यातलगच उभी राहतात. या अवजड वाहनांतून माल छोट्या टेम्पोत भरून दुकानात नेला जातो, असे प्रकार दिवसभर सुरू असल्याने वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
या रस्त्यालगत ट्रकमधील लोखंडी साहित्यामुळे अनेकदा जीवघेणे अपघात घडले आहेत. त्यामुळे या ट्रक चालकांबरोबरच या व्यावसायिकांवरसुद्धा कडक कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच याठिकाणी अनेक वजनकाटे असून वजनकाटेसुद्धा रस्त्यालगतच आहेत.त्यामुळे वजन करण्यासाठी येणाऱ्या वाहनांच्याही लांबच लांब रांगा भर रस्त्यातच लागतात. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचाच झाला आहे. सार्वजनिक बांधकाम खाते किंवा वाहतूक विभागाचे पोलीस संबंधित व्यवसायिक तसेच त्यांच्या या वाहनांवर कोणतीच कारवाई करत नाहीत. हडपसर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या या अजवड वाहनांवर कारवाई करीत रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.