नगर -दमदार पावसाने तालुक्यातील गुंडेगाव व डोंगर माथ्यावर अनेक लहानमोठे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे डोंगरातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हौशी लोकांचे पाय या डोंगरमार्गाकडे वळत आहेत. विशेषतः रविवार सुट्टीच्या दिवशी लोकांची गर्दी दिसून येते आहे.
या वर्षी पावसाळ्यात गुंडेगाव डोंगरात अनेक लहान मोठे धबधबे प्रवाहित झालेले दिसत आहेत, हिरव्यागार डोंगर रांगा त्यावर अच्छादलेला जणू हिरवा शालू डोंगरातून नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता, तर खडकांतून कपारीतून ओसंडून वाहाणारे लहान-मोठे धबधबे, अंगाला झोंबणारा गारगार वारा, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी असे विलोभनीय निसर्गाचा मुक्त अविष्कार पहाण्यासाठी गावातील लोक व पर्यटक पावसाळ्यात या गुंडेगावच्या निसर्गाचा फेरफटका मारताना दिसतात.
नगर पासुन गुंडेगाव हे सुमारे 30 कि.मी.लांबीचा रस्ता आहे. या डोंगर परिसरात गोसावी बाबा पासून सुमारे 1 ते 2 कि.मी.अंतरावर एक मुख्य धबधबा आहे. उंच डोंगरकपारीतून ओसंडून वाहणारा हा धबधबा थेट गुहेवर पडताना दिसतो, त्यामुळे या डोंगर परिसरात प्रवास करताना या धबधब्याचे विलोभनीय दृश्य पाहिल्याशिवाय पुढे जाऊशिच वाटत नाही.
तसेच या धबधब्याखाली आंघोळीची मजा घेण्याचा मोह आवरणार नाही हे नक्की, याशिवाय या परिसरात अनेक लहान-मोठे धबधबे आपणास आकर्षित करतात. अशा निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी पिकनिक पॉईंट तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाचा बिनधास्त आनंद घेता येईल.
जेणेकरून पिकनिक पॉईंटवरुन पर्यटक डोंगरकपारीबरोबर दऱ्याखोऱ्यांचे विलोभनीय दृश्य पहातील त्याचप्रमाणे लहान मोठे धबधबे हळूच खुणवत आहेत, लांबून येणारे मोरांचे व पक्षाचे आवाज ऐकून मन हरखून जाते, पावसाळ्यात शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी हौशी व धाडसी पर्यटक या पावसाळी पर्यटनांचा आनंद घ्यावा.
गुंडेगाव हे विकसित गाव आहे, त्याबरोबर निसर्ग सौंदर्य परिसर प्रेमी आहे हेच यातून पहावयास मिळते असे, दादासाहेब आगळे (गुंडेगाव) यांनी सांगितले आहे.