विदेशात असूनही करण सिन्हा देताहेत माणदेशी स्वप्नांना भरारी : प्रभात सिन्हा
म्हसवड (प्रतिनिधी) – सातारा जिल्ह्यातील माणदेशी तरुणासाठी पहिल्या नावीन्यपूर्ण ग्रंथालयाचे भूमिपूजन म्हसवड येथील मेगा सिटीमध्ये माणदेशी फौंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांच्या उपस्थितीत व 2019 च्या एमपीएससीमधील बेस्ट स्टुडंट विजय पिसे यांच्या मातोश्री विमल पिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या ग्रंथालयाच्या जडणघडणीत माझे बंधू करण सिन्हा यांचा सिंहाचा वाट आहे. ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असले तरी माणदेशी स्वप्नांना भरारी देण्याचे त्यांचे काम सुरू आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे “माणदेशी चॅम्पियन्स’चे अध्यक्ष प्रभात सिन्हा म्हणाले.
कार्यक्रमास बीएसएनएलचे सुनील कुलकर्णी, म्हसवडचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, उपाध्यक्ष जवाहर देशमाने व मान्यवर उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियमांचे पालन करण्यात आले. प्रभात सिन्हा म्हणाले, या ग्रंथालयाची मूळ संकल्पना चेतना सिन्हा यांची असली तरी खा. हुसेन दलवाई यांच्या मदतीतून हे कार्य पूर्णत्वास जात आहे. श्रीमती सिन्हा म्हणाल्या, या ग्रंथालयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोलाची मदत होईल. तरुणांना मोबाइलएैवजी ग्रंथाची गोडी लागल्यास ते देशाचे भविष्य घडवतील. या कार्यक्रमासाठी सारंग नवाळे, श्रीकांत पतंगे, अक्षय पोळ व करण सिन्हा मित्र परिवाराने परिश्रम घेतले.
फेसबुक पेजद्वारे साधला संवाद
गंथालय भूमिपूजनाच्या निमित्ताने करण सिन्हा यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. मी अमेरिकेत असलो तरी माझे माणदेशावर लक्ष असते. या भूमीने मला सर्व काही दिले आहे. ते परत देण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.
या ग्रंथालयासाठी दोन वर्षे पाठपुरावा केला. छत्रपती शाहू महाराजांची जयंती व ग्रंथालयाची स्थापना, हा योगायोग म्हणावा लागेल. माझी सतत नवे करण्याची धडपड असते. ग्रंथालय ही फक्त सुरुवात आहे. माझ्या माणदेशी मातीला जेवढे देईन तेवढे कमीच आहे. या मातीने हजारो रत्ने दिली आहेत. अशीच रत्ने या ग्रंथालयातून घडावीत, ही अपेक्षा आहे.
करण सिन्हा , जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी, अमेरिका