पुणे – शहरातील करोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यातच पालिकेच्या सुमारे 159 कर्मचाऱ्यांना करोनाची संसर्ग झाला आहे, तर एकूण 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
करोना बाधित होणाऱ्या कामगारांचा आकडा थांबतच नसल्याने कर्मचाऱ्यांचे संरक्षण करायचे तरी कसे, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. तर, बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये 85 टक्के सफाईसेवक आहेत. या कामगारांना प्रशासनाने मास्क, हॅन्डग्लोव्हज तसेच सॅनिटायझर्स तसेच काही कर्मचाऱ्यांना पीपीई किट दिले असले, तरी बाधितांची संख्या कमी होण्यास तयार नाही.
लॉकडाऊन काळात पालिकेचे सफाई कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अवितरत कार्यरत होते. मात्र, या काळात ालिका कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील अन्य रुग्णांसह पालिकेच्या बाधित कर्मचाऱ्यांचा आकाडाही लक्षणीय वाढला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जूनअखेर 159 कर्मचारी करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये 115 महापालिकेचे कायमस्वरूपी सेवक असून 44 कंत्राटी कामगार आहेत. तर सुमारे 77 कर्मचाऱ्यांना उपचारनंतर घरी सोडण्यात आले असून, 69 जणांवर उपचार सुरू आहेत.
कामगारांत भीतीचे वातावरण
या बाधितांमध्ये सुमारे 85 टक्के कर्मचारी हे सफाई सेवक आहेत. त्यामुळे इतरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, या कर्मचाऱ्यांसाठी पालिकेकडून स्वतंत्रपणे समुपदेशनाचे उपक्रमही घेण्यात आले असले, तरी रोज नवीन बाधित कर्मचाऱ्यांची भर पडत असल्याने इतर कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत.