समाजातील सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी समाजाचा शारीरिक, मानसिक, भावनिक व आर्थिक स्तर उंचावा या हेतूने आय. एम. डी. एस. ची (इन्स्टिट्यूट ऑफ महा ई-लर्निंग ऍन्ड डिग्निटी स्किल डेव्हलपमेंट लिमिटेड) स्थापना झाली आहे. लोकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी व समृद्ध जीवन जगता यावे, समाजाच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान देता यावे यासाठी या संस्थेची उभारणी करण्यात आली आहे. मानवी जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या आय. एम. डी. एस.च्या महाउद्योजक व निधी कार्यालयाचे आज मंगळवारी दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता वडूज (ता. खटाव) येथे उदघाटन होत आहे त्यानिमित्ताने…
भारत सरकारच्या कौशल भारत – कुशल भारत योजनेमध्ये तसेच माहिती व तंत्रज्ञान विभागामध्ये प्रशिक्षण भागीदार असलेल्या आय. एम. डी. एस. या संस्थेची स्थापना वडूज येथील युवा उद्योजक अमोल गोविंदराव शिंदे यांनी 2013 मध्ये केली. समाजाची सद्यस्थिती पाहता स्वयंरोजगार म्हणजेच लघुउद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन व आर्थिक पाठबळाची गरज ओळखून भारत सरकार निधी कायदा 2014 च्या अंतर्गत आय. एम. डी. एस. निधी लिमिटेड या आर्थिक संस्थेची स्थापना करण्यात आली.
या संस्थेचा मूळ उद्देश बचत व बचतीतून सामूहिक विकास हा आहे.नवउद्योजकांना संस्थेच्या महाउद्योजक कौशल्य उद्योजकतेच्या माध्यमातून व्यवसाय निवड, कौशल्य चाचणी, प्रशिक्षण, प्रकल्प अहवाल, खतावणी, भांडवल, प्रकल्प स्थापना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उत्पादित केलेल्या वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या सर्वच गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध करुन दिल्या आहेत. स्वतःचा व्यवसाय व उद्योग विकास करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मार्गदर्शन व पाठबळ उभे करुन दिले जाते. संस्थेच्या सभासदांना बचत खाते, मुदत ठेव खाते, आवर्ती ठेव खाते याद्वारे बचतीची सवय लावून कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.
सध्याच्या इंटरनेटच्या युगाचा विचार करुन सर्व व्यवहार ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे सभासदांना सर्व व्यवहार व कर्ज त्वरीत उपलब्ध होते. संस्थेमध्ये तरुण, तरुणी, नवउद्योजक, बचत गट, सहकारी संस्था, खासगी संस्था, परंपरागत व्यवसाय करणारे सभासद होऊ शकतात. सभासदांना उद्योगासाठी कमी व्याजदरामध्ये उद्योग कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. कौशल्य व उद्योजकता आणि लघुउद्योग विकास करुन यशस्वी उद्योजक घडवल्यामुळे आय. एम. डी. एस. ला भारतातील निधी क्षेत्रातील पहिली यशस्वी संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.
या संस्थेच्या लघुउद्योग विभागाकडे जवळपास 210 यशस्वी उद्योग प्रकल्प तयार असून 14 प्रकल्प बाजारपेठेसहीत उपलब्ध आहेत. मुंबई येथे संस्थेने स्वतःचे भव्य, सुसज्ज व अद्ययावत कार्यालय उभारले आहे. याशिवाय नाशिक, पुणे (पिंपरी), वाशी, सातारा, वडूज, कडेगाव, दापोली आदी ठिकाणी संपर्क कार्यालये सुरु केली आहेत. संपूर्ण देशामध्ये 700 हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून सर्वच स्तरातील व क्षेत्रातील हजारो युवक, युवती, महिला, पुरुष व नोकरी स्वयंरोजगाराचे धडे गिरवून स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले आहेत.
महाराष्ट्रामध्ये दहा हजार सभासद असून त्यापैकी अनेकांनी लघु उद्योगांची उभारणी करुन एक यशस्वी उद्योजक होण्याचा बहुमानही पटकविला आहे. राज्यातील सुमारे एक हजार 600 खासगी संस्थांना संस्थेने कुशल मनुष्यबळ पुरविले आहे. करोना संसर्ग व लॉकडाऊनच्या काळात सर्वत्र मंदीचे सावट आहे. अशा परिस्थितीत खचून न जाता उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून मंदीत संधी शोधण्याचा मूलमंत्र संस्थेने दिला आहे.
उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या घटकांसाठी संस्थेने आर्थिक पाठबळ उभे करून दिले आहे. मानवी जीवनाच्या परिवर्तनामध्ये आय. एम. डी. एस. निधी लिमिटेडमुळे खऱ्या अर्थाने प्रगतीस चालना मिळण्यास मदत होणार आहे. म्हणूनच परंपरागत व्यवसाय करणारे, विविध प्रशिक्षण केंद्रचालक, बेरोजगार, तरुण, गृहिणी, बचतगट इत्यादींनी औद्योगिक क्षेत्रात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन आय. एम. डी. एस. मार्फत करण्यात येत आहे.
शब्दांकन – प्रा. ए. के. माने वडूज.