पुणे – लडाखमधील गलवान खोरे येथील सीमारेषेवर चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीदरम्यान शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतर्फे (एनडीए) आदरांजली वाहण्यात आली.
शहीद कर्नल बाबू हे प्रबोधिनीच्या 105 व्या तुकडीचे विद्यार्थी होते. तसेच 2010 ते 2011दरम्यान प्रबोधिनीत प्रशिक्षक म्हणूनही ते सेवारत होते. 15 जून रोजी चिनी सैन्यासोबत झालेल्या वादामध्ये त्यांना वीरगती प्राप्त झाली. लष्करी सेवेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्री यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
प्रबोधिनीच्या परंपरेनुसार, लष्करी कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या शहीद जवानांचे नाव “हट ऑफ रिमेम्बरन्स’ या शहीद जवानांच्या स्मारकामध्ये असलेल्या पवित्र भितींवर सुवर्णक्षरांनी लिहिले जाते. याच भिंतीवर शहीद कर्नल बाबू यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. “कर्नल बाबू हे त्यांच्या शौर्य, कर्तव्य निष्ठेसाठी कायम स्मरणात राहतील. त्यांचे कार्य प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देईल,’ अशी भावना प्रबोधिनीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल असित मिस्री यांनी व्यक्त केली.