संयुक्तराष्ट्रे- 2019 या वर्षापर्यंत युद्ध, संघर्ष, आणीबाणीची स्थिती किंवा अत्याचारामुळे जगभरातील आठ कोटी लोकांना स्थलांतर करावे लागले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या अहवालात देण्यात आली आहे. सन 2019 या एका वर्षातच वरील कारणांमुळे 1 कोटी 10 लाख लोकांना विविध ठिकाणांहून स्थलांतर करावे लागले आहे.
यातील 24 लाख लोकांना देशाबाहेर आश्रय घ्यावा लागला आहे, तर 86 लाख लोकांना त्यांच्याच देशाच्या सीमावर्ती भागापर्यंत स्थलांतर करावे लागले आहे. या स्थलांतरित लोकांना पुन्हा त्यांच्या मूळ गावी परत आणण्याचे फारसे प्रयत्न झाले नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगभरातील ही स्थलांतरितांची आतापर्यंतची एकूण संख्या सुमारे 8 कोटी इतकी असून जगातील. 97 लोकांपैकी किमान एका व्यक्तीचा स्थलांतरितांमध्ये समावेश आहे.
स्थलांतरितांची ही आकडेवारी पद्धतशीरपणे संकलित केली गेली आहे. संयुक्त राष्ट्रांतील निर्वासितांच्या विभाग प्रमुखांनी म्हटले आहे की, स्थलांतरितांचा हा प्रकार जगभर सर्वत्र घडला असला तरी एकूण स्थलांतरितांपैकी 85 टक्के स्थलांतर हे गरीब देशांमधून झाले आहे.