– घरात असूनही गणवेश बंधनकारक, डबेही खाल्ले
– वही-पुस्तकांऐवजी लॅपटॉप आणि मोबाइलची गोडी
पुणे: शाळेचा पहिला दिवस म्हणजे नवा गणवेश, नवी पुस्तके आणि त्यांचा सुगंध…शाळेत जाण्यासाठी चाललेली चिमुकल्यांची धावपळ आणि उत्सुकता…उन्हाळी सुट्टीनंतर मित्र-मैत्रिणींना भेटण्याची ओढ, नव्या वर्गात प्रवेश आणि नव्या टीचरबद्दल आदरयुक्त भीती असे सारे चित्र दरवर्षी साधारणपणे 15 जून रोजी दिसते. यंदा मात्र या साऱ्या आनंदावर करोनामुळे विरजण पडले आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू होण्याचा मुहूर्त साधत सोमवारी शहरातील बऱ्याच खासगी शाळा ऑनलाइन भरवण्यात आल्या आहेत.
करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावून शिक्षण देण्याचा धोका पत्करणे योग्य नसल्याची बाब शिक्षक, पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू करण्याला शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शाळांनीदेखील ऑनलाइनचा मार्ग निवडला आहे. सोमवारी शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ओळख करुन देत ऑनलाइन शिक्षणाबाबतची माहिती दिली. राष्ट्रगीत, प्रार्थना या बरोबरच विद्यार्थ्यांना संस्काराचे धडे देत, गोष्टी सांगत वर्ग भरले.
अशी झाली पूर्वतयारी…
शाळा ऑनलाइन भरणार असल्याची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांना असल्याने त्यांनीही मोबाइल फोन, टॅब, संगणक, लॅपटॉपची जमवाजमव केली. ऑनलाइन शिक्षण सुरू असताना पालकांनी विद्यार्थ्यांच्या शेजारी बसू नये, अशा सूचनाही शाळांकडून पालकांना देण्यात आलेल्या आहेत. काही शाळांमध्ये शिक्षक, कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांच्या बैठकाही घेण्यात आल्या.
अशी भरतेय ऑनलाइन शाळा
शाळांमध्ये इयत्तानिहाय विद्यार्थ्यांचे व्हॉट्स ऍप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. यू-ट्युब, ऑडिओ, व्हिडिओ क्लिपद्वारे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी या सर्वांनी विद्यार्थ्यांना ओळख करुन दिली. शाळेबाबत आणि वेळापत्रकाचीही माहिती देण्यात आली. विद्यार्थी घरी असले, तरी त्यांना शाळेत असल्यासारखेच वाटले पाहिजे यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
मा.स.गोळवलकर गुरुजी विद्यालय : मुख्याध्यापिका मंजूषा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या उपक्रमांनी ऑनलाइन शाळा सुरू केली आहे. वेळापत्रकाप्रमाणे सकाळी 7.30 वाजता राष्ट्रगीत, प्रार्थनेने शाळेची सुरूवात झाली. विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करूनच बसण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थी जेवणाचा डबाही घेऊन बसले होते.
न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड : मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी पाचवी, सहावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी ओळख करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांना छानछान गोष्टी सांगण्यात आल्या.
राज्य शासनाचे आदेश आल्यानंतरच जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबतचे नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सोमवारी ऑनलाइन शाळा सुरू झालेली नाही.
– सुनील कुऱ्हाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे