नगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात सर्व व्यवहार, उद्योगधंदे सुरळीत होत असताना राज्य सरकारने विडी उत्पादन व विक्रीवरील निर्बंध उठवले नसल्याने लाखो विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे उत्पादन, विक्रीवरील निर्बंध उठवा अशी मागणी करण्यात येत आहे.
पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह स्मारक येथे लालबावटा युनियन व इंटकच्या वतीने उपोषण करण्यात आले. विडी कामगारांच्या हाताला काम न मिळाल्यास 10 जून रोजी विडी कामगार शहरात भिक मागो आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली.
उपोषणात कॉ.शंकर न्यालपेल्ली, कॉ.महेबुब सय्यद, कॉ.बहिरनाथ वाकळे सहभागी झाले होते. विडी कामगारांना हाताला काम मिळण्यासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, राज्यमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन अर्ज करुन विडी विक्रीस परवानगी मिळण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, राज्य सरकार विडी कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून 80 दिवस उलटून देखील हाताला काम नसल्याने विडी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहरातील विडी कामगार तीन-तीन व्यक्तींचे ग्रुप करुन तोंडाला मास्क लावून करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन भिक मागो आंदोलन करणार असल्याचे कॉ.शंकर न्यालपेल्ली यांनी सांगितले.