नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, आज आणखी पाच करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बाधितांची संख्या 212 झाली आहे, तर बाधितांच्या संपर्कातील 29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच 56 अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेनी दिली आहे.
जिल्ह्यात आज राहाता तालुक्यात तीन करोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. निघोज निमगाव येथील 50 वर्षीय, तर प्रवरानगर येथील 34 वर्षीय महिला व 11 वर्षांच्या मुलाचाही करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील पंचपीर चावडी येथील 48 वर्षीय व्यक्तीला करोनची लागण झाली आहे. ही व्यक्ती करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आली होती. त्यामुळे पंचपीर चावडी येथील भाग सील करण्यात आला आहे. तसेच त्याच्या संपर्कातील नागरिकांचा मनपा प्रशासनाने शोध सुरू केला आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील 14 वर्षीय मुलीला करोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या आता 212 झाली आहे.
महानगरपालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या 47 झाली आहे. दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, संपर्कातील नागरिकांचा शोध सुरू केला आहे. तसेच संबंधित ठिकाणी जा-ये करण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.
आज 12 जण करोनामुक्त
नगर शहरातील पाच, संगमनेर येथील दोन, कर्जत तालुक्यातील राशीन येथील दोन, नेवासे, राहाता, अकोले येथील प्रत्येकी एक असे, जिल्ह्यातील 12 व्यक्ती आज करोनामुक्त झाल्या आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 121 करोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत.