शिमला: गर्भवती गायीला स्फोटकमिश्रित खाद्यपदार्थ खाऊ घातल्याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली. गायीचे मालक गुरदयाल सिंग यांनी आरोप केला आहे की, दाहत या गावातील गर्भवती असलेल्या त्यांच्या गायीला कुणीतरी स्फोटकमिश्रित खाद्यपदार्थ खाऊ घातल्यामुळे तिची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. यात त्याचा शेजारी नंद लाल याचा हात असल्यांचा त्यांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी नंद लाल याला अटक केली आहे.
गुरदयाल यांनी या घटनेसंबंधी एक व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पोलिसांनी प्रत्यक्ष घटना स्थळाची पाहणी केली. पोलिसांना गायीच्या तोंडाला आणि जबड्याला जबर गंभीर जखम झालेली दिसली.
ही घटना अशावेळी समोर आली आहे की, नुकतेच केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील वेलियार नदीत एका गर्भवती हत्तीचा मृत्यू झाला होता. तिला स्फोटकमिश्रित अननस खायला दिल्यामुळे तिचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता.