कलेढोण -खाटाव तालुक्यातील कलेढोण येथील आतकरी मळ्यातील 45 वर्षांच्या महिलेला करोनाची लागण झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या महिलेचे कुटुंब 14 मे रोजी अहमदाबाद येथून आठ व्यक्तींसोबत खासगी वाहनातून कलेढोण येथील आतकरी मळा येथे आले. या कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. या कुटुंबातील 45 वर्षांच्या महिलेस सोमवारी (दि. 18) त्रास सुरू झाल्याने मायणीतील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवले.
परंतु, त्रास कमी न झाल्याने दि.20 रोजी मायणी येथील शासकीय रुग्णालयात नेल्यावर त्यांना कराड येथे खासगी वाहनाने पाठवण्यात आले. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता या महिलेचा अहवाल करोनाबाधित आला. प्रशासनाने त्यांच्या कुटुंबातील 5 व्यक्ती व वाहनाच्या चालकाला विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले आहे. कलेढोणसह 2 किलोमीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हूणन घोषित करण्यात आला आहे. यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, वैद्यकीय विभागाचे डॉ. युनुस शेख, सुशील तुरूकमाणे, प्रवीण देशमुखे यांनी परिस्थितीचा आढावा घेत खबरदारीच्या उपाययोजना गाव करोना कमिटीस सांगितल्या.