नवी दिल्ली – दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 3.4 रिश्टर स्केल असल्याची माहिती देण्यात आली. देशाच्या राजधानीत महिन्याभरात तिसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
रविवारी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास दिल्लीसह परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.4 असल्याची नोंद झाली आहे. या भूकंपाचे केंद्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशनजीकच्या सीमाभागात असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.
दरम्यान, दि. 12 आणि 13 एप्रिल रोजीही दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. 12 एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकजण आपापल्या घरातच होते. त्यामुळे सततच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे.