जुन्नर(प्रतिनिधी) – शिरूर मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील आरोग्य सेवकांना शुक्रवारी (दि. ८) सेफ्टी किट्सचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील १२ प्राथमिक उपचार केंद्र व २ ग्रामिण रुग्णालयात देण्यात आलेल्या या किटसमध्ये एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क, ग्लोज, सॅनेटायझर आदी आवश्यक साहित्य होते.
याप्रसंगी विघ्नहर सहकारी कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँगेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, जगदंब प्रतिष्ठानचे विश्वस्त सागर कोल्हे, नगरसेवक भाऊ कुंभार, फिरोज पठाण, महिला जिल्हाध्यक्ष उज्वला शेवाळे, शहराध्यक्ष धनराज खोत, विजय कोल्हे, जितेंद्र चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सदर साहित्य गटविकास अधिकारी विकास दांगट व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.
करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांनी लॉकडाऊन नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन याप्रसंगी सागर कोल्हे यांनी केले. खासदार डॉ. कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या जगदंब प्रतिष्ठानने सहा तालुक्यातील ५० प्राथमिक केंद्रे, २० पोलीस स्टेशन, १० ग्रामीण रुग्णालय, १ जिल्हा उपरुग्णालयात याच प्रकारे उपयोगी साहित्याचे वाटप केले आहे. तसेच तालुक्याच्या आदिवासी भागात या प्रतिष्ठानच्या वतीने किराणा साहित्याचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती तुषार डोके यांनी दिली.