मुंबई: पालिकेच्या शीव रुग्णालयात करोनाच्या रुग्णाच्या मृतदेहांचे घाणेरडे राजकारण विरोधी पक्षाचे काही लोक करू पाहात आहेत. करोनाच्या मृतांचे राजकारण करून मृतांना व उपचार करणाऱ्या डॉक्टरांना अपमानित करू नका, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या केईएम रुग्णालयात मृतदेह काही दिवस पडून आहेत, असे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. तर शीव रुग्णालयात एका मृतदेहाशेजारच्या खाटेवर दुसरा रुग्ण असून परिचारिका तशाच परिस्थितीत रुग्णावर उपचार करत असल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच भाजपाच्या काही नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही काही आक्षेप उपस्थित केले आहेत. याकडे लक्ष वेधून करोनाच्या लढाईत डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी आपल सर्वस्व पणाला लावून रुग्णांवर उपचार करत असताना किमान वस्तुस्थिती समजून घेऊन नंतरच योग्य ती टीका करणे अपेक्षित असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.
काही रुग्णांचे मृत्यू होतात तेव्हा नातेवाईकांना कळवण, मृतदेह अन्यत्र हलवणे, मॉर्गमध्ये जागेची व्यवस्था करणे व त्यासाठी लागणार्या मनुष्यबळाची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी थोडा वेळ लागणारच. अशावेळी शेजारी असलेल्या रुग्णाला औषध देणे तसेच धीर देण्याचे काम एखादी परिचारिका व डॉक्टर करत असले तर “मृतदेहाशेजारी रुग्णावर उपचार’ अशा प्रकारचा व्हिडिओ काढणे हा गंभीर गुन्हा तर आहेच. पण त्याच्या आधारे जर विरोधक टीका करणार असतील तर ते त्याहून गंभीर गुन्हेगार आहे, असे चोख प्रत्युत्तर टोपे यांनी दिले.
चौकशी समिती स्थापन
या व्हिडीओची सत्यता आणि वास्तविकता तपासण्यासाठी रुग्णालयाकडून एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच या समितीला 24 तासांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून चौकशीत दोषी आढळलेल्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता (प्र) डॉ. प्रमोद इंगळे यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात असे प्रकार घडू नये म्हणून कठोर निर्देश देण्यात आले असून रुग्णालय प्रशासनही सर्व प्रकारची काळजी घेत आहे.