एकाच दिवसात 12 रुग्णांची भर; बाधितांची संख्या 135 वर
पिंपरी – शहरातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने करोनाचा कहर झाला आहे. गेल्या चोवीस तासांत करोना रुग्णांची संख्या 15 ने वाढली असून, आज (मंगळवारी) दिवसभरात 12 करोनाबाधित आढळून आले आहेत. आज आढळून आलेल्या बाधितांमध्ये आठ पुरुष आणि एका दीड महिन्याच्या मुलीसह 4 महिलांचा समावेश आहे. यामध्ये 25 ते 37 वर्षांच्या तीन तर 75 वर्षांच्या एका महिलेचा समावेश आहे. यामुळे बाधितांचा आकडा 135 वर पोहोचला आहे.
काल (सोमवारी) दिवसभरात तिघांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज (मंगळवारी) पुन्हा तब्बल 12 जणांना करोनाची बाधा झाली आहे. हे सर्व रुग्ण तळवडे, रुपीनगर, संभाजीनगर, जुनी सांगवी व मोशी परिसरातील आहेत. बाधित 75 वर्षीय महिला ही शिवाजीनगर, पुणे येथील
रहिवासी आहे. आज बाधा झालेल्या पुरुषांमध्ये एका 4 वर्षीय लहान मुलाचा व 74 वर्षीय इसमाचा समावेश आहे. याशिवाय 11 ते 61 या वयोगटातील 6 जणांचा समावेश आहे. आज पुन्हा तळवडे, रुपीनगर परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रुग्ण बाधित रुग्णांच्या “हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आल्यामुळे त्यांनाही संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बाधित रुग्णांची संख्या 135 वर पोहचली असली तरी आतापर्यंत शहरातील 57 व शहराच्या हद्दीबाहेरील 2 असे एकूण 59 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. तर शहरातील तिघांचा व हद्दीबाहेरील दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आज बाधितांची संख्या वाढल्याने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात 64 करोना बाधितांवर उपचार सुरू असून शहरातील रहिवासी असलेल्या 11 जणांवर शहराबाहेरील रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.
सोमवारी दिवसभरात वायसीएममध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आज (मंगळवारी) पुन्हा नव्याने 206 एवढे संशयित रुग्ण महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत. त्यापैकी 204 जणांचे अहवाल अद्यापही प्रतिक्षेत आहेत. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्या 108 जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
आजपर्यंत 3385 जणांची करोना तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3047 एवढ्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर महापालिका हद्दीतील एकूण 19 हजार 838 एवढ्या घरांना कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन 58 हजार 983 नागरिकांचे सर्वेक्षण केले. बाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनापुढील आव्हान आणखी वाढू लागले आहे.
अवघ्या दीड महिन्याच्या मुलीला बाधा
आज करोनाची बाधा झालेल्यांमध्ये अवघ्या दीड महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. बाधिताच्या संपर्कात आल्यामुळे या मुलीला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढ्या कमी वयाच्या मुलीला लागण झाल्याची शहरातील ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी एका दहा महिन्याच्या मुलीला करोनाची बाधा झाली होती. शहरात लहान मुलांना करोनाची बाधा होण्याचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.