थेऊर -करोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेनंतर 17 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय झाला असला तरी शासनाने वाईन शॉप सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे तळीरामांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते; परंतु बहुतांश जिल्हा प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्याने आज ती दुकाने उघडली नाहीत. अनेक तळीरामांनी दारुची दुकाने उघडतील म्हणून दुकानांभोवती चकरा मारल्या; मात्र त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाल्याने त्यांनी निराश पावलांनी घराकडे जाण्याचा रस्ता धरला.
4 मे रोजी दारूची दुकाने उघडतील, असे शासनाने जाहीर केले होते. त्यामुळे दुकानांबाहेर सोमवारी सकाळपासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. टाळेबंदीमुळे मागील सव्वा महिन्यांपासून मद्यविक्रीची दुकाने (वाइनशॉप) आणि बिअर बार बंद आहेत. त्यामुळे मद्यप्रेमींची चांगलीच पंचाईत झाली होती; मात्र सोमवारी इतर दुकानांबरोबर मद्यविक्रीची दुकाने उघडली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोमवारी सकाळ पासूनच लोणी काळभोर, ऊरूळी कांचन, यवत, वाघोली, सासवड या पुणे शहरानजीकच्या ग्रामीण भागातील विविध मद्य विक्रीच्या दुकानाबाहेर मद्य विकत घेण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यानंतर दुकानदारांनी दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत असे फलक लावले. यामुळे तळीरामांची निराशा झाली. शहरासहीत ग्रामीण भागात करोनाने अक्षरशः थैमान घातल्याने पुणे जिल्ह्याचा समावेश रेडझोनमध्ये आहे. रुग्ण वेगाने वाढत असूनही काही भागात प्रशासनाने नियमांत शिथिलता आणली आहे. असे असले तरी प्रतिबंधित क्षेत्र ( कन्टेंमेंन्ट झोन ) देखील मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आलेने काही ठिकाणी औषधे, भाजीपाला यांच्यासोबतच किराणा विकायला देखील निर्बंध घालण्यात आले आहेत.