औषधांच्या साठवणुकीसाठी चीनने करोनाचे गांभीर्य लपवले

वॉशिंग्टन : करोनाच्या साथीला आटोक्‍यात आणण्यसाठी आवश्‍यक असणाऱ्या औषधांचा साठा करता यावा म्हणून चीनने करोनाचे गांभीर्य लपवले, असा आरोप अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी केला आहे. चीनच्या नेत्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला करोनाचे गांभीर्य जाणीवपूर्वक जगापासून दडवून ठेवले, असा गोपनीय अहवालच अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलॅन्ड सिक्‍युरिटीने दिला आहे. 1 मे रोजीचा हा अहवालच “द असोसिएटेड प्रेस’ या वृत्तसंस्थेच्या हाती लागला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अगदी अलिकडे नव्याने चीनवर पुन्हा टीका करायला सुरुवात केली आहे. करोनाच्या फैलावाबद्दल चीनला जबाबदार धरले जायला हवे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री माईक पॉम्पेओ यांनीही म्हटले होते. ही टीका होत असतानाच करोनाच्या साथीला आटोक्‍यात आणण्यासाठी सरकारांकडून केले जात असलेले प्रयत्न अपुरे आहेत, अशी टीकाही ट्रम्प प्रशासनाकडून केली जायला लागली आहे.

मात्र या टीकेला न जुमानता चीनकडून औषधांची आयात वाढवली गेली आणि निर्यात कमी केली गेली आहे, असे निरीक्षकांनी म्हटले आहे.वैद्यकीय सामुग्री, औषधे, सर्जिकल गाऊन, हातमोजे आणि फेसमास्क सारख्या आवश्‍यक बाबींची विदेशातून आयात करण्यासाठीच करोना विषाणू संसर्गजन्य आहे, ही बाब देखील चीनने जागतिक आरोग्य संघटनेपासून जानेवारीपर्यंत दडवून ठेवली. आयात आणि निर्यातीमध्ये चीनकडून झालेल्या 95 टक्‍क्‍यांपर्यंत बदल झाला आहे. हा बदल नेहमीसारखा नाही, असेही या अहवालात म्हटले आहे.

काही अतिगंभीर चुका झाल्यामुळेच चीनमधून करोना विषाणूचा फैलाव झाला असावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. चीनमधील प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असावा, या दाव्याच्या आधारे अमेरिकेचे गुप्तचर शोध घेत आहेत. हा विषाणू जाणीवपूर्वक पसरवला गेला असावा, असे न वाटण्याचे काहीही कारण नसल्याचे पॉम्पेओ म्हणाले होते. सदोष वस्तू जगाला पुरवण्याची आणि अडचणीत आणण्याचा चीनचा इतिहास असल्याचेही ते म्हणाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.