जिल्हा कारागृहातील आणखी दोन कैदी बाधित; तरडगावचे बालकही पॉझिटिव्ह
सातारा – तरडगाव (ता. फलटण) येथील करोनामुक्त डॉंक्टर तरुणीच्या कुटुंबातील सहा वर्षांच्या मुलासह सातारा जिल्हा कारागृहातील आणखी दोन कैद्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची संख्या आता 77 झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 56 जणांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर 58 संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी करोनामुक्त झालेल्या महिलेच्या निकट सहवासातील 6 वर्षीय बालक, पुण्यावरून सातारा जिल्हा कारागृहात आलेल्या आणखी दोन कैद्यांना करोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. पुणे कारागृहातून सातारा कारागृहामध्ये आलेले दोन कैदी (वय वर्षे 31 व 58) क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल आहेत.
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या आणखी दोन कैद्याचा आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील एक बालक (वय 6), अशा एकूण तीन जणांचा करोना (कोव्हिड19) अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामुळे जिल्हा कारागृहातील एकूण चार कैदी करोनाबाधित झाले आहेत तर तरडगावमधील करोनामुक्त तरुणीच्या कुटुंबातील मुलाला लागण झाली आहे.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील 40 व कोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयातील 16, अशा 56 नागरिकांचे करोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. आता जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 77 झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत नऊ रुग्ण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात 29 (आरोग्य कर्मचारी तीन, करोनाबाधितांच्या निकट सहवासातील 14, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे तीन, करोनाबाधित परिसरातील गरोदर माता सहा), कृष्णा मेडिकल कॉलेजमधील चार (श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गामुळे चार), वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात 25 (आरोग्य कर्मचारी सात, करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासातील 16, श्वसन संस्थेच्या तीव्र जंतूसंसर्गाचा एक, गरोदर माता एक) अशा एकूण 58 संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. या 58 जणांबरोबर करोनाबाधित रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे चार नमुने, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आठ दिवसांनंतरचे दोन नमुने, असे 64 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली.