पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मिळणारा वेळ स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी सत्कारणी लावल्यास त्याचा उपयोग नक्कीच आपल्या कार्यक्षेत्रात होईल असा विचार करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) व डॉ.अंजली मॉरीस एज्युकेशन अँड हेल्थ फाउंडेशन यांच्या द्वारा संयुक्तरित्या आयोजित संपूर्ण पुणे जिल्ह्यातील विशेष शिक्षक, विशेष साधन व्यक्ती यांच्या सक्षमीकरणासाठी दिव्यांग (विशिष्ट अध्ययन अक्षम) मुलांच्या शिक्षणासंदर्भात ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही कार्यशाळा पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. अंजली मॉरीस फाउंडेशनच्या सीईओ डॉ. उमा कुलकर्णी व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांच्या संकल्पना व पुढाकारातून घेण्यात येत आहे.
कोवीड 19 मुळे सारे घरात असलो तरी शिकण्याची प्रक्रिया थांबता कामा नये. सर्व मुलांप्रमाणेच विशेष मुलांचाही शिकण्याचा अधिकार आहे. आपण त्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे, असे आयुष प्रसाद यांनी सांगितले.
21 एप्रिल ते 8 मे या कालावधीत एकूण सहा सत्रामध्ये कार्यशाळेची विभागणी करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेचा उद्देश अध्ययन अक्षम मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सक्षमपणे टिकवून ठेवण्यासाठी,त्यांची शिघ्र ओळख करून योग्य हस्तक्षेपाद्वारे अमलात आणावयाच्या उपचारात्मक शिक्षण पद्धती, आधुनिक अध्यापन तंत्रे यासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. त्याचप्रमाणे गणित भाषा (वाचन-लेखन) यामध्ये अध्ययन अक्षम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कोणती अध्ययन-अध्यापन तंत्रे वर्गात शिक्षकांनी वापरावीत, या विद्यार्थ्यांचे अध्ययन अक्षम असलेले प्रमाणपत्र कसे प्राप्त करावे या संदर्भात ही मार्गदर्शन केले जाणार आहे .
समावेशित शिक्षणचे राज्य समन्वयक अजय काकडे यांनी सहभाग घेऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या दरम्यान वरिष्ठ अधिव्याखाता डॉ. राजेश बनकर व डॉ. दयानंद जटनुरे यांनी कार्यशाळेला योग्य व दिशादर्शक असे चर्चात्मक मुद्दे मांडले . या कार्यशाळेला पुणे महापालिका शिक्षणाधिकारी दिपक माळी व प्रकल्प अधिकारी शिल्पकला रंधवे सहभागी झाल्या होत्या. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून अधिव्याख्याता सुरेखा दरवडे व मॉरिस फौंडेशन तर्फे प्राजक्ता फडके ह्या समन्वयक म्हणून कामकाज पाहत आहेत. कार्यशाळेमध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत सर्व अधिव्याख्याता, समावेशित शिक्षणचे कामकाज करणारे जिल्हा समन्वयक तसेच या संस्थेच्या अधिनस्थ पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेत दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेले सर्व विशेष शिक्षक व समावेशित शिक्षण साधन व्यक्ती उस्फूर्तपणे सहभागी झालेल्या आहेत .
दिव्यांग मुलांमधील अध्ययन अक्षमता हा महत्त्वाचा विषय आहे. शिक्षक-पालक यांनीही ही संकल्पना समजून घेणे गरजेचे आहे. अध्ययन अक्षम मुले ओळखणे व वेळीच त्यांना उपचारात्मक अध्यापन करणे, योग्य मूल्यमापन करणे या सर्व बाबीचा समावेश या कार्यशाळेत आहे. समावेशितच्या संपूर्ण टीमला या कार्यशाळेचा उपयोग विशेष मुलांसाठी काम करताना नक्कीच होणार आहे, असे डॉ. कमलादेवी आवटे यांनी सांगितले आहे.