न्यूयॉर्क : करोनाने जगभरात हैदोस घातला असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी खरा विनाश तर अजून दिसायचाय असे सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. करोनाचा प्रभाव अजूनही कमी झाला नसताना अनेक देश निर्बंध शिथील करत आहेत त्याच पार्श्वभुमीवर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी हा इशारा दिला आहे.
“आमच्यावर विश्वास ठेवा, खरा विनाश तर अजून दिसायचाय,” असं टेड्रोस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे संकट रोखायला हवे. हा एक व्हायरस आहे जो अजूनही अनेक लोकांना समजलेला नाही, असेही ते बोलले आहेत.
दरम्यान, टेड्रोस यांनी यावेळी जगभरात जवळपास १ लाख ६६ हजारांहून जास्त जणांचा बळी घेणारा करोना व्हायरसचा प्रादुर्भाव का वाढेल याचं कोणतंही ठाम कारण सांगितलं नाही. जागतिक आरोग्य संघटनेने अफ्रिकेतून आजार पसरण्यास सुरुवात होईल असा दावा केला आहे. अफ्रिकेतील आरोग्य सेवा विकसित नसल्याने तेथून आजार पसरेल असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
आशिया आणि युरोपातील काही देशांनी करोनाचे रुग्ण आणि मृतांची संख्या कमी होऊ लागल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. यामुळे शाळा, उद्योग सुरु करण्यात आले असून सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंदी उठवण्यात आली आहे. तसेच क्वारंटाइन होण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे.