नेवासा -पानेगाव येथील पत्रकार व जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नवगिरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी नेवासा प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देऊन करण्यात आली.
पानेगाव येथील करोनाच्या पार्श्वभूमीवर 17 कुटुंबांना होम क्वारंटाईन केले तसेच गावातील अवैध धंद्यांबाबत वृत्तपत्रात बातमी छापल्याचा राग मनात धरून पत्रकार बाळासाहेब नवगिरे यांच्या घरावर संबधीत सुमारे 100 ते 125 नागरिकांनी मोर्चा काढून नवगिरे यांना घरात घुसून मारहाण केली. या प्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा नेवासा प्रेस क्लबच्या वतीने निषेध करून दोषींवर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदार रुपेश सुराणा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास पठाडे, संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे, सचिव अशोक डहाळे उपस्थित होते. निवेदनावर उपाध्यक्ष कैलास शिंदे, नानासाहेब पवार, शाम मापारी, सुधीर चव्हाण, रमेश शिंदे, ज्ञानेश्वर जाधव, संदीप वाखुरे, मकरंद देशपांडे, पवन गरुड, अभिषेक गाडेकर यांच्या सह्या आहेत.