विना मास्क आल्यास पालिकेत प्रवेश बंदी
पुणे – करोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत राज्यशासनाने सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही पालिकेतील कर्मचारी मास्क घातल नसल्याने या आजाराचा फैलाव होण्याची भिती आहे, त्यामुळे कामावर उपस्थित राहणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबाबतचे आदेश सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी देण्यात आले आहेत. तसेच, जे कर्मचारी मास्क घालणार नाहीत तसेच शहराच्या इतर भागातून मुख्य इमारती मध्ये येतील त्यांना मास्क नसल्यास महापालिकेत प्रवेश बंदी असणार आहे.
केंद्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर शासकीय कार्यालयातील उपस्थिती 5 टक्के करण्यात आली आहे. मात्र, करोनामुळे अनेक कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या कामांसाठी तैनात करण्यात आले आहे. त्यामुळे पालिकेत कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली आहे.
त्यात पुणे आणि मुंबई महापालिकेच्या परिसरात करोनाचा वाढता प्रादूभाव असल्याने या सुरू असलेल्या शासकीय कार्यालयांमध्येही करोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यशासनाने 6 एप्रिलला याबाबत आदेश काढत कार्यालयात आल्यापासून ते घरी जाई पर्यंत या कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.
मात्र, अनेक कर्मचारी विना मास्कच उपस्थित राहत असल्याचे समोर आले आहे. ही बाब गंभीर आहे. त्यामुळे प्रशासनाने याची गंभीर दखल घेत शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांना महापालिकेत येताना मास्क घालणे बंधनकारक केले आहे.