पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेकडून शहरात लोखंडी विद्युत खांबात विद्युत प्रवाह उतरून होत असलेल्या अपघातांच्या घटना रोखण्यासाठी शहरात शाॅक प्रूफ फायबरचे खांब बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत दोन हजार खांब बसविण्यात येणार असून त्यासाठी ५ कोटींचा खर्च केला जाणार आहे.
मात्र, हे खांब निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप होत असून मध्यवर्ती पेठांमध्ये लावण्यात आलेल्या काही खांबावरील दिव्यांचे लोखंडी बार दिव्यासह तुटून पडले आहेत. त्यामुळे या खांबाबाबत महापालिकेने फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाने नागरिकांची मागणी नसताना देखील शहरातील चांगले लोखंडी विद्युत खांब काढून त्या ठिकाणी एफआरपीचे शॉक प्रूफ खांब बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
पालिकेकडून हे खांब उत्तम दर्जाचे असल्याचे सांगत यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही विदयुत विभागाने रविवार पेठ, गणेश पेठ भागासह इतर भागात असे खांब उभारले आहेत. मात्र आता हे खांब निकृष्ट दर्जाचे स्पष्ट झाले असून या खांबाला विद्युत दिव्यासाठी लावण्यात आलेला पाइप गळून पडला आहे.
गरज नसताना तसेच नवीन आणि चांगले खांब असताना ते काढता त्याच्या शेजारी शॉक प्रूफ खांब बसविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रकाराला आम्ही विरोध केला होता. रास्ता पेठ, भवानी पेठ, शुक्रवार पेठ आणि बाजीराव रस्त्यावर गरज नसताना शॉक प्रूफ विद्युत खांब बसविले जात आहेत. आता याच खांबांवरील विद्युत दिवा बसवलेला पाइप तुटून पडत असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. – विशाल धनवडे, माजी नगरसेवक (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना)