सातारा (प्रतिनिधी) : अत्यावशक सेवेत नसतानाही सातारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र घेऊन शहरातून विनाकारण फिरणार्या वरद नंदकुमार चक्के, अमेय दिलीप जगताप ( दोघे रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्यावर जमावबंदी आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी महिला पोलीस हवालदार वैशाली गुरव यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरव या इतर सहकार्यांसह राधिका रोड परिसरात गस्त घालत होत्या. त्यावेळी संशयित दोघे त्यांच्याकडील दुचाकी क्रं( एमएच 11सीपी5433) वरुन निघाले होते. त्यांना पोलिसांनी थांबवून बाहेर येण्याचे कारण विचारले असता वरद याने सातारा नगरपालिकेच्या शीघ्र प्रतिसाद पथकातील भालचंद्र डोंबे यांचे ओळखपत्र दाखवून पेट्रोल भरण्यासाठी निघाल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्याच्याकडे आधार कार्डची मागणी केली असता त्याने दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, संशयित दोघांनी सातारा पालिका कर्मचाऱ्याच्या ओळखपत्राचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्या दोघांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शाहूपुरी गुन्हा दाखल करण्यात आला.