सिंगापूर – आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी अभावी कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा घट झाली असून हे भाव आता प्रति बॅरल 26.72 डॉलर्सवर आले आहेत. तेलाच्या दरातील ही घट 8 ते 5.7 टक्के इतकी आहे. करोना प्रादुर्भावामुळे विमान वाहतूक बंद असून जहाज वाहतूक आणि अन्य ठिकाणीची वाहनांची वाहतूकही बंद असल्याने तेलाच्या मागणीत मोठी घट नोंदवली गेली आहे.
मागणी कमी झाल्याने तेलाचे भाव आणखी कोसळू नयेत म्हणून तेलाचे उत्पादनच कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्या विषयी तेल उत्पादक संघटनेची बैठक होणार होती; पण ती पुढे ढकलल्याने या भावात आज पुन्हा घट नोंदवली गेली. तशातच रशिया आणि सौदी मध्ये तेलावरून किंमत युद्ध सुरू आहे.
त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी व रशियात या किंमत युद्धाविषयी तडजोड होईल आणि हे दोन्ही देश आपले तेल उत्पादन कमी करतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. तेल उत्पादनाविषयी तेल उत्पादक देश आणि रशिया या देशांची आज सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा होणार होती. पण ही बैठक गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्या बैठकीतील निर्णयावर तेलाचे भाव अवलंबून आहेत.