महापौरांचे पुन्हा एकदा पुणेकरांना आवाहन
पुणे – घरोघरी माहिती घेण्यासाठी येणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अजूनही अडचणींचा सामना करावा लागत आहे, तरी नागरिकांनी या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहन पुन्हा एकदा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंतर्गत पुणे महापालिका प्रशासनाने आजतागायत सर्व पातळ्यांवर मोठ्या प्रमाणावर यशस्वी उपाययोजना अंमलबजावणी करीत आहेत. परंतु, घरोघरी जाणाऱ्या मनपा पथकातील कर्मचाऱ्यांना काहीप्रसंगी अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
घरामध्ये परदेश प्रवास करून कोणी आलेले आहेत का, घरातील कोणाला आजारपण, थंडीताप, खोकला, सर्दी अथवा काही करोना सदृश लक्षणे दिसून येत आहे का, विलगीकरण कशासाठी आणि त्याची आवश्यकता काय, महत्त्वाचे उपाय, अशी सर्व माहिती पथकातील कर्मचारी विचारून नागरिकांना करोनाबाबत जनजागृती करून मार्गदर्शन करत आहेत.
परंतु, अजूनही काही नागरिकांकडून जलद सहकार्य आणि आवश्यक माहिती देण्याचे टाळले जात आहे. अशाप्रकारे मनपा पथकाला माहिती न देणे, लक्षणे असताना न सांगणे, संशयित व्यक्तींचे नाव, पत्ते अथवा पुरेशी माहिती देत नसल्यामुळे पथकातील कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येऊन प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी दैनंदिन अडचणी येत आहेत.
घरोघरी येणाऱ्या पथकाला करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबाबत पुणे मनपाच्या वतीने वारंवार नागरिकांनी सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तरी कृपया सद्यस्थितीमधील करोना विषाणू प्रादुर्भाव परिस्थितीचा विचार करता पुणे महापालिकेच्या वतीने घरोघरी येणारे पथक, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना सहकार्य करून करोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधाच्या लढ्यात कृपया सर्वांनी सहकार्य करावे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर