सातारा -जिल्हा रुग्णालयात करोना संशयित म्हणून दाखल करण्यात आलेल्या सहा जणांपैकी 22 वर्षीय युवकाचा करोना (कोव्हिड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या पुन्हा चार झाली आहे.
मरकज काळात दिल्लीत भेट दिलेल्या पाच नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील 29 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिलेला जिल्हा रुग्णालयात तर 21 ते 25 वर्षे वयोगटातील दोन पुरुष व एका महिलेला संशयित म्हणून कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयात काल (दि. 5) दाखल असलेल्या कोव्हिड-19 रुग्णाच्या निकटच्या सहवासात आलेल्या 4 ते 68 वर्षे वयोगटातील 12 नागरिकांना (8 पुरुष व 4 महिला) विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
25 ते 85 वर्षे वयोगटातील तीन नागरिक (दोन पुरुष व एक महिला) श्वसनसंस्थेतील तीव्र जंतुसंसर्गामुळे संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये 2 ते 54 वर्षे वयोगटातील चार पुरुषांना श्वसनसंस्थेतील तीव्र जंतुसंसर्गामुळे संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 24 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने सोमवारी पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.