बारामती- शहरातील श्रीरामनगर येथे आणखी दोन करोनाग्रस्त रुग्ण असल्याची खोटी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करणाऱ्या तीन जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश अरविंद शिरसट (रा. गुणवडी ता.बारामती), अनुप सुरेश देशमाने (रा.भोईगल्ली बारामती) सागर राजेंद्र पलंगे (रा. खाटीकगल्ली बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पोलीस नाईक पांडुरंग रंगनाथ गोरवे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्हॉट्सऍप ग्रुपवर एकूण सात व्यक्तींचा एकत्रित असलेला फोटो टाकून त्यामध्ये एका व्यक्तीचे चित्रावर जांभळे रंगाचे गोल मार्कींग करून त्यामध्ये ही व्यक्ती करोना रुग्ण असल्याचे खोटे सांगितले आहे. तर श्रीरामनगर परिसरात अजून 2 रुग्ण आढळले आहे, असा मराठीत मजकूर लिहून व्हाट्सऍप ग्रुपवर प्रसारित करून नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पुढील तपास पोलीस नाईक खाडे करीत आहेत.