सोमाटणे – श्री साईबाबा मंदिर (प्रतिशिर्डी) संस्थानाच्या वतीने बुधवारपासून (दि. 18) ते पुढील शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती संस्थानाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश देवळे यांनी दिली.
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्याला अटकाव घालण्यासाठी राज्यातील संस्थानांनी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे भाविकांसाठी बंद करावेत, असे राज्यशासनाने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिरगाव येथील साईबाबा मंदिर बुधवारपासून पुढील शासकीय आदेश येईपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे.
शिरगाव मंदिरात देशभरातून तसेच परदेशातून देखील भाविक मोठ्या प्रमाणावर साईच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे. या कालावधीत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी राहणार असले तरी मंदिरात नियमित पूजा व आरत्या सुरू राहणार आहेत. मात्र 25 मार्च या दिवशी गुढी पाडव्यानिमित्त मंदिर खुले राहणार असल्याचे देवळे यांनी सांगितले.
मंदिर दर्शनासाठी बंद केल्याने दूरवरून आलेल्या भाविकांना दर्शनाशिवाय परत जावे लागत होते. त्यामुळे भाविकांमध्ये काहीसी नाराजी दिसत होती.