मुंबई: कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा, सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा चुकीचा दावा करता आहेत.
दिशाभूल करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर अन्न आणि औषध प्रशासनामार्फत गुन्हा दाखलकरण्यात येणार आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
उत्पादकाने कोरोनावर औषधी उपाय असल्याचा दावा करणारी चुकीची जाहिरात केल्यास किंवा नागरिकांत संभ्रम निर्माण केल्याचे दिसून आल्यास अशा उत्पादक, जाहिरातदार व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे डॉ.शिंगणे म्हणाले.
कोरोनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. यासाठी सर्व शासकीय कार्यालये, महामंडळे, स्वायत्त संस्था दिवसरात्र कार्यरत आहेत. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
कोरोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरिहंत मॅट्रेसेसचे मालकांनी यांनी 13 मार्चला एका गुजराती वृत्तपत्रात ‘अरिहंत ॲन्टी कोरोना व्हायरस मॅट्रेस’ या मॅटरेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल अशी जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केली.
तसेच त्याद्वारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरविली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे गुरक्र भादवि कलम 166, 505(2) आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 सह औषधीद्रव्य व जादुटोना (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबरोबर विशिष्ट आयुर्वेदिक औषधाचे सेवन केल्यास कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी रोग प्रतिरोधक औषधी अशा आशयाचा मजकूर असलेली आक्षेपार्ह मजकूर असलेली जाहिरात प्रकाशित केली होती.
तसेच 16 मार्चला अन्न व औषध प्रशासन विभागाने मुंबई येथील शितल आयुर्वेद भांडार प्रा. लि. या औषध उत्पादन व विक्री कंपनीवर औषधे व जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा 1954 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यांतर्गत सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही ची तरतूद आहे.